ब्रेन वॉश ( भाग १ )
बऱ्याच दिवसांनी आज अचानक एका जुन्या मित्राची भेट झाली. सिग्नल वर थांबलो तर तो माझ्या शेजारीच उभा होता. "अरे अभय कसं काय ? कुठे फ़िरतोयस ?" मी त्याला विचारलं. "अरे मी सेंटर वर गेलो होतो सत्संग ऐकायला. तो बोलला. आणि तु का बरं येत नाहीस आता श्रवणाला ?" त्याचा प्रश्न. मी सिग्नल कडे पाहिलं तर सिग्नल हिरवा व्हायला २८ सेकंद शिल्लक होते. आता त्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर २८ सेकंदात देता येणं शक्य नव्हतं. त्याचा प्रश्न सहज असता तर फक्त स्माईल देऊन निघून गेलो असतो. पण प्रश्न विचारताना त्याच्या डोळ्यात तीच उत्सुकता होती जी दहा वर्षांपुर्वी त्याच्या डोळ्यात होती. दहा वर्षांपुर्वी मीच त्याला त्या सत्संगाचा रस्ता दाखवला होता. म्हणून मी त्याला म्हटलं "चल आपण चहा घेऊयात. सविस्तर बोलणं पण होईल आपलं." त्यानं आनंदानं होकार दिला. सिग्नल सुटला आणि आम्ही जवळच एका हॉटेलात जाऊन बसलो. ⧫⧫⧫ "जवळपास चार-एक वर्षांनी भेटतोय ना आपण ?" त्यानंच सुरुवात केली संभाषणाला. "अरे हो ना झालेच अस...