बिल्ला
तुम्ही कधी मारुती कार च्या बोनेट वर मर्सिडीज चा लोगो लावलेला बघीतलाय का? काही जण हौस म्हणून आपल्या कार वर महागड्या गाड्यांचे लोगो लाऊन मिरवतात. असं केल्यानं आपली गाडी मर्सिडीज कंपनी ची आहे असं लोकांना वाटेल आणि आपली शान वाढेल असा गोड गैरसमज करून घेतात बिच्चारे! पण तसं काही होत नाही. गाडी खरंच महागडी आहे का हे तिच्यावर चिकटवलेल्या लोगोवरुन नाही तर तिच्या दिसण्यावरुन ओळखायला येतं. पण काही जण इतके कलंदर असतात कि ते कार ची रंगरंगोटी सुद्धा लक्झरी कार सारखी करुन ठेवतात त्यामुळे काही लोकांना ते फसवण्यात यशस्वी होतात. पण तरीही जे कार चे खरे जाणकार आहेत ते सहज ओळखू शकतात कि ही कार नकली आहे ! मी हे कारचं उदाहरण देऊन काय सांगायचा प्रयत्न करतोय हे तुमच्या मनात चाललं असेल, हो ना? तर मी आता स्पष्टिकरण करुन सांगतो. हि तर झाली गाड्यांची गोष्ट. परंतु माणसंही गाड्यांसारखीच असतात. तुम्ही म्हणाल माणसांवर कुठं लोगो चिकटवलेले असतात? आठवा कधीतरी कुठंतरी तुम्ही माणसांवरही लोगो चिकटवलेला बघीतला असेल. आठवलं? ...