ब्रेन वॉश ( भाग ३ )
मला माहित होतं कि आपल्या गुरूंची आलोचना ऐकून घेणं सहज नव्हतं अभय साठी. म्हणून मी त्याला आधी एक प्रश्न केला. मी त्याला विचारलं, "गेली दहा वर्षे तू स्वीकारभाव वाढवण्याची साधना करतोयस, तर आता काहीही ऐकून घेण्याइतका स्वीकारभाव तर नक्कीच आला असेल तुझ्यात, हो ना?" "हो नक्कीच. तू बिंदास बोल, मी चिडणार नाही." अभय जरा अति आत्मविश्वास दाखवत बोलला. "ऐक तर. पण मी जे सांगतोय ते ऐकताना तू थोडा प्रयत्न करशील कि जे काही मी सांगेन ते कोणत्याही आध्यात्मिक मान्यतांच्या गाळणीतुन फिल्टर करून ऐकायचं नाही. असं ऐक जणू तू अध्यात्म मार्गात अजून गेलाच नाहीस. अगदी तसंच जसं तू दहा वर्षांपूर्वी ऐकलं होतंस. कठीण आहे, पण कर प्रयत्न." अभय न हलकंसं हसत होकार दर्शवला. "बघ, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात छोटी मोठी दुःखं येतातच. प्रत्येकाला सुखाची ओढ असते आणि दुःख नकोसं असतं. दुःखापासून दूर राहणे हीच प्रत्येकाची इच्छा असते. पण सुखद किंवा दुःखद घटनांवर आपलं काहीच नियंत्रण नाही हे कटुसत्य प्रत्येकाला माहित असतं. आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपण घडणाऱ्या घटनांना रोकु...