ब्रेन वॉश ( भाग ३ )

मला माहित होतं कि आपल्या गुरूंची आलोचना ऐकून घेणं सहज नव्हतं अभय साठी. म्हणून मी त्याला आधी एक प्रश्न केला. मी त्याला विचारलं, "गेली दहा वर्षे तू स्वीकारभाव वाढवण्याची साधना करतोयस, तर आता काहीही ऐकून घेण्याइतका स्वीकारभाव तर नक्कीच आला असेल तुझ्यात, हो ना?"

"हो नक्कीच. तू बिंदास बोल, मी चिडणार नाही." अभय जरा अति आत्मविश्वास दाखवत बोलला.


"ऐक तर. पण मी जे सांगतोय ते ऐकताना तू थोडा प्रयत्न करशील कि जे काही मी सांगेन ते कोणत्याही आध्यात्मिक मान्यतांच्या गाळणीतुन फिल्टर करून ऐकायचं नाही. असं ऐक जणू तू अध्यात्म मार्गात अजून गेलाच नाहीस. अगदी तसंच जसं तू दहा वर्षांपूर्वी ऐकलं होतंस. कठीण आहे, पण कर प्रयत्न." 

अभय न हलकंसं हसत होकार दर्शवला. 


"बघ, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात छोटी मोठी दुःखं येतातच. प्रत्येकाला सुखाची ओढ असते आणि दुःख नकोसं असतं. दुःखापासून दूर राहणे हीच प्रत्येकाची इच्छा असते. पण सुखद किंवा दुःखद घटनांवर आपलं काहीच नियंत्रण नाही हे कटुसत्य प्रत्येकाला माहित असतं. आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपण घडणाऱ्या घटनांना रोकु शकत नाही आणि आपल्या मनासारख्या घडवून आणू शकत नाही. हे सत्य माहित असूनही ते कडू आणि कठोर असल्यामुळं आपलं मन ते स्वीकारायला तयार होत नाही. मग आपण फँटसि करतो, कल्पना करतो कि किती छान झालं असतं जर आपल्याला घटनांना नियंत्रित करता आलं असतं? नको घटनांना, पण कमीत कमी आपल्या सुखद किंवा दुःखद अनुभवांना तरी नियंत्रित करता यावं हि आशा आपल्या मनात असते. मग आपण उपाय शोधतो. पण बाजारात कुठेही हा उपाय उपलब्ध नसतो. मग आपण धार्मिक ग्रंथाचा आधार घेतो. असा उपाय अस्तित्वात असल्याचा दावा धार्मिक ग्रंथांमध्ये केला जातो. पण मग त्यासाठी सतगुरु ला शरण जावं लागेल हि अट घातलेली असते. आता सतगुरु कुठं शोधायचा? हा एक महाप्रश्न! सतगुरु ची कृपा झाली आणि शिष्याला मोक्ष मिळाला, शिष्य दुःखमुक्त झाला, अश्या कित्येक कथा आपण लहानपणापासून ऐकल्या- वाचलेल्या असतात. त्या कथांची सत्यता पडताळून पाहण्याची कोणतीच सोय उपलब्ध नसते. त्या कथांचे पुरावे हि नसतात. तरीही त्या कथा आपण सत्य-कथा म्हणून स्वीकारतो. का? कारण त्या आपल्या दुःखमुक्तीच्या मनमोहक परिकल्पनांना पोषक असतात. त्या कथा आपल्याला धीर देतात, दिलासा देतात. "दुःखमुक्ती शक्य आहे" हे वाक्य आपल्याला जगण्यास प्रेरणा देतं. रटाळवाण्या जीवनास ध्येय देतं. मग आपला शोध सुरु होतो सतगुरु साठी. संसारात भरपूर ढोंगी गुरु ठाण मांडून बसले आहेत हे देखील माहित असतं आपल्याला तरी देखील आपला आशावाद आपल्याला सांगतो कि तुला खरा सतगुरु  मिळेलच कारण तू पुण्यवान आहेस. प्रत्येकजण स्वतःला पुण्यवानच समजत असतो हि पण एक मजेदार गोष्ट आहे!"

"गरज आणि पुरवठा" हा मार्केट चा पाया आहे. मार्केट चा हा नियम ज्यांना छान कळतो ते भरपूर पैसे कमावतात. ह्याच तत्वावर सत्संगाचा व्यापार चालतो. लोकांना दुःखमुक्ती हवी आहे, ती आम्ही देऊ असं आश्वासन हे ढोंगी गुरु देतात. ते आश्वासन आपण विकत घेतो आणि त्याची किंमत म्हणून देतो आपलं तन मन आणि धन !बरं किंमत चुकवून हि आपण दुःखमुक्त होतो का खरंच ? मुळीच नाही! पण तसा भ्रम आणि देखावा निर्माण केला जातो. गेल्या गेल्या तुम्हाला गुरु मुक्त करत नाही, आधी तर तो तुमच्या मनात हि गोष्ट खोलपर्यंत रुजवतो कि तुम्ही पापी आणि पतित आहात. तुम्ही विकारांनी आणि वासनांनी ग्रस्त आहात. दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला  गुरु ला  शरण जावं लागेल अर्थातच त्यांनी दिलेली प्रत्येक आज्ञा शंका न घेता पाळावी लागेल. आपण त्यांच्या या कथनावर विश्वास ठेवला हे लक्षात येताच त्यांना हे कळून चुकतं कि आलेला शिष्य गाढव आहे, त्याला काहीही सांगितलं तरी तो सहज मानायला तयार आहे. मग ते हळू हळू तुमची बुद्धी आपल्या ताब्यात घेतात. तुम्ही गुरु वर शंका घेऊ नये याची व्यवस्था सर्वात आधी केली जाते. त्यासाठी तुमच्या इमोशन्स ला स्पर्श केल्या जातो. तुम्ही सांसारिक दुःखांनी ग्रस्त आहात आणि मीच तुमचा मुक्तिदाता आहे हे तुमच्या मनात हळू हळू बिंबवण्यात येतं. मोक्षासाठी पात्रता लागते आणि ती तयार करण्यासाठी साधना करावी लागेल असं तुमच्या मनात ठसवून तुम्हाला पूर्णपणे ते आपल्या काबूत घेतात. तुम्ही भक्ती च्या नावाखाली गुलाम बनलात हे तुमच्या लक्षात हि येत नाही. किंबहुना तुम्हाला गुलामी पण मंजूर आहे हे म्हणवून घ्यायची पण तयारी करवून घेतली जाते."


अभय च्या चेहऱ्यावर शून्यता पसरली होती. तो माझ्या बोलण्यावर संशय घेतोय हे माझ्या लक्षात येत होतं. कारण गुरु वारंवार शिष्यांकडून एक वचन घेतात कि गुरु शिवाय कुणाच्याही गोष्टीत यायचं नाही आणि गुरु वर अविश्वास करायचा नाही.

तरीही मी बोलणं थांबवलं नाही, "शिष्यांना काहीही करून नेहमीसाठी संभ्रमात लटकून ठेवणे हे एकच काम ढोंगी गुरु करतात. शिष्य जर मुक्त झाला तर मग तो गुरूच्या चरणांत पडून राहील का? शिष्याला जर ज्ञान मिळालं तर तो पण गुरु बनून सिंहासनावर बसणार नाही का? हि भीती त्या ढोंगी गुरूच्या मनात असते, म्हणूनच तर त्यांच्या शिष्यांपैकी एकालाही परमिशन नसते गुरु बनून मिरवण्याची."

"पण ते असं का बरं करतात ? त्यांना असं करून काय मिळतं ?" अभय नं  मधेच थांबवत मला विचारलं.

" पॉवर मित्रा पॉवर ! पैसा, पॉवर, पद आणि प्रसिद्धी ह्या चार गोष्टी निसर्गतःच मानवास आकर्षित करतात. गुरु म्हणवून घेणाऱ्या व्यक्ती ला हि त्यांचा मोह आवरता येत नाही. त्यासाठी हा सगळा खेळ रचला जातो. फॉलोअर्स ची संख्या जितकी जास्त तितकी पॉवर जास्त आणि पैसा हि भरपूर! या चार गोष्टींसाठीच ढोंगी गुरु तुम्हाला कायमचं गुलाम बनवून ठेवतात. आणि तुम्ही त्या गुलामी ला "भक्ती" असं गोंडस नाव देऊन हसत हसत गुलामी स्वीकारता. खरं म्हणजे ते तुमच्या लालचीपणाचा गैरफायदा उचलतात. सत्संगात आलेली व्यक्ती हि सांसारिक व्यक्तींपेक्षा हि अधिक लालची असते हे तथ्य ढोंगी गुरु जाणून असतो. कारण सांसारिक लोकांना फक्त पैश्याची , कार आणि बंगल्याची लालुच असते, पण अध्यात्मिक माणसाला परमार्थाची , मोक्षाची लालुच असते . म्हणजेच तो मोठा लालची असतो ! अश्या लालची लोकांना ठगून आपण काही चुकीचं काम नाही करत आहो असं त्या ढोंगी गुरूला वाटत असतं."

"म्हणजे मी सुद्धा लालची आहे, असं म्हणायचं आहे का तुला?" अभय चा भोळा प्रश्न!

मी त्याचा चेहरा बघून हसलो आणि म्हटलं," अर्थातच! तू, मी आणि प्रत्येकजण लालची आहे. फरक एवढाच कि आपल्याला लालुच असलेल्या वस्तू भिन्न भिन्न आहेत. ऍक्चुअली लालची असण्यात काहीच गैर नाही, पण अश्या गोष्टीची लालुच करणे जिच्या अस्तित्वाचा पुरावाच नाही, माझ्या मते हा मात्र मूर्खपणा आहे"


"म्हणजे दुःखमुक्त अवस्था अस्तित्वातच नाही, देव, ईश्वर, परमेश्वर, मोक्ष ह्या सगळ्या भाकडकथा आहेत असं तुझं मत आहे. हो ना?" अभय चा आवाज थोडा वर चढला होता.

"ईश्वराचं अस्तित्व आहे कि नाही तो वेगळा विषय आहे. कदाचित असेल किंवा नसेल. पण मी ह्या ढोंगी गुरु लोकांविषयी बोलतो आहे. स्वतःला गुरु म्हणवून घेणाऱ्या या ढोंग्यांना खरंच ईश्वर मिळाला आहे का ते पडताळायला नको का? ते काहीही फेकतील आणि आपण ते झेलायचं का? आपल्या भोळ्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन हे लोकं आलिशान आश्रम बांधतात, लक्झरी गाड्यांनी फिरतात, विमानप्रवास करतात. ह्या गोष्टींना विरोध आहे माझा. तुला जो मोबाईल फोन हवा आहे तो त्या दुकानात उपलब्ध आहे कि नाही या गोष्टीची तू आधी खात्री करतोस ना? जर दुकानदारानं मोबाईल दाखवला तरच तू विकत घेतोस हो ना? मग गुरु ला आधी का नाही कुणी विचारत कि तुम्ही ईश्वराच्या गोष्टी करता तर आधी दाखवा तुमच्याकडे ईश्वर आहे कि नाही ते. पण नाही, तुम्हाला ते आधीच सांगतात कि ईश्वराला भेटण्यासाठी आधी पात्रता बनवावी लागते. तो असा सहज भेटत नाही. आणि तुम्ही त्या ढोंग्यांच्या गोष्टीत येता." मी एकादमात बोललो.

"मला अजूनही कठीण जातंय तू जे सांगतोयस त्यावर विश्वास ठेवणं" अभय सोफ्यावर मागे सरकत बोलला.

"तेच तर म्हणतोय मी मित्रा, जेवढी शंका तू माझ्या बोलण्यावर घेतो आहेस त्यातली दहा टक्के जरी गुरु च्या सांगण्यावर केली असती तरी तुझ्या लक्षात आलं असतं कि ते  तुला दहा वर्ष मूर्ख बनवण्यात यशस्वी झालेत. मी तुला ब्लेम तरी कसा करू? माझी स्वतःची तीच गत होती. दहा वर्षे पर्यंत मी हि त्यांच्याच गोष्टीत आलेलो होतो. एक दोन मित्रांनी मला हि असाच समजावण्याचा प्रयत्न केला होता आणि मी हि त्यांचा असाच विरोध केला होता."


"मग तुला त्यांच्या ढोंगीपणाची शंका केव्हा यायला लागली ?" अभय नं आता कुठं खरा प्रश्न केला!


"गुरुजी अगदी पहिल्या प्रवचनापासून काही गोष्टींवर जोर देऊन सांगायचे. त्यातली पहिली गोष्ट होती "स्वीकार." मी विचार केला कि गुरुजी दुसऱ्यांना स्वीकार करायला शिकवतात पण स्वतः किती स्वीकार भावात जगतात? तर मला असं जाणवलं कि त्यांना स्वतःलाच बऱ्याच गोष्टी स्वीकार नाहीत. शिबीर न केलेली व्यक्ती त्यांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही, त्यांना इतर सेंटर वर कुणी प्रवचनासाठी आमंत्रित केलेलं आवडत नाही आणि ते जातही नाहीत. त्यांच्या संस्थेच्या महत्वाच्या निर्णयात इतर कुणी  हस्तक्षेप केला तर ते चिडतात हे पण मी अनुभवलं होतं. त्यांच्या किंवा त्यांच्या संस्थेच्या विरोधात कुणी काही बोललं तर ते त्याच्या हालचालींवर इतर साधकांना लक्ष ठेवायला सांगायचे. दुसऱ्यांना स्विकार शिकवणारा माणूस स्वतःच चिडचिडा आहे हे पण मला जाणवलं होतं.

दुसरी गोष्ट ते सांगायचे कि निर्वाण प्राप्त झालेल्या माणसाचं मन निर्मळ आणि अकम्प असतं. पण जेव्हा त्यांच्या खास शिष्यांपैकी काहींनी त्यांच्याशी विद्रोह केला तेव्हा ते इतके हादरले होते कि प्रवचनांमधून ते त्या शिष्यांबद्दल आणि त्यांच्या चारित्र्या बद्दल अपप्रचार करायचे.

तिसरी गोष्ट ते नैतिकता शिकवायचे. पण त्यांचा एका लाडक्या शिष्यानं केलेला अनैतिक प्रकार त्यांनी आपल्या पाठीशी घातला.

ते अंतर्यामी आहेत असा अप्रत्यक्ष दावा ते करायचे परंतु बऱ्याच गोष्टींची भीती त्यांच्या मनात असायची. विद्रोह करून निघून गेलेल्या शिष्यांकडून त्यांच्या जीवाला धोका आहे अशी भीती त्यांना वाटत होती.

ते ज्या कथा आपल्या सत्संगात सांगायचे ते त्यांच्या हृदयातून आलेल्या आहेत असा दावा ते करायचे पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी ओशो च्या प्रवचनातून चोरलेल्या होत्या हे इंटरनेट च्या माध्यमातून मला माहित व्हायला लागलं.

त्यांना क्रेडिट देऊन त्यांच्या नावानं प्रकाशित केलेली कित्येक पुस्तकं दुसऱ्या लेखकांच्या पुस्तकातून कॉपी केलेली आहेत.

ते म्हणतात कि मोक्ष मिळालेल्या माणसात अहंकार शिल्लक नसतो, तो अगदी साधारण जीवन जगतो. पण ते स्वतः त्यांच्याच स्वतः च्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांच्याच पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आलेल्या सेलेब्रिटीज सोबत स्टेज शेअर करत नाहीत. ते स्वतः कधी सामान्य माणसासारखं बाजारात जाऊन शॉपिंग करत नाहीत. नातेवाईकांच्या घरी तर सोडाच पण ते त्यांच्याच संस्थेच्या इतर शहरांमधल्या सेंटर वरचे आमंत्रण पण स्वीकारत नाहीत. मला सांग हा अहंकार नाही तर काय आहे?"

माझ्या प्रत्येक शंकेवर आणि प्रश्नावर न्यायसंगत उत्तर तयार होतं माझ्या मित्राकडे. गुरुजी च्या अश्या वागण्या मागं किती अंडरस्टॅण्डिंग आहे हे पटवून देण्यात वस्ताद असतात त्यांची भक्तरुपी पिलावळ. पण माझ्या गोष्टींना तार्किक विरोध करता येण्याएवढी कुवत अभय मध्ये नव्हती. तो निमूटपणे सर्व ऐकत होता.

"आणि हो तू ज्याला सद्गुरूंचं स्थान दिलं आहे तो 'माणुस' म्हणवण्याच्या हि लायकीचा नाही आहे हे मी तुला आता सिद्ध करून दाखवतो. लक्ष देऊन ऐक. हि घटना आहे २००८ किंवा ०९ च्या मधातली. पुण्याला गुरुजींचं मोठं शिबीर होतं. त्या शिबिरासाठी महाराष्ट्रातील सर्वच सेंटर वरून साधक जमले होते. शिबीर सकाळी १० वाजता सुरु होणार होतं. त्या शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि गुरुजींच्या दर्शनासाठी मेहकर शहरातून काही साधक आपल्या खाजगी वाहनातून रात्री पुण्याकडे निघालेत. पहाटे ३ वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता कि सात जणांचा जागीच मृत्यू झाला. एक दोन जण गंभीर जखमी झालेत. हि बातमी पुण्यात शिबिरापर्यंत पोचली, पण ह्या नालायक गुरुजींची असंवेदनशीलता तर बघ कि त्यांनी त्या मृतकांच्या आत्म्या ला श्रद्धांजली म्हणून शिबीर रद्द करणं तर दूर पण साधं २ मिनिट मौन पाळून श्रद्धांजली सुद्धा अर्पण नाही केली. इतकंच काय तर औपचारिक रित्या माईक वरून ह्या घटनेची माहिती पण जमलेल्या साधकांना नाही देऊ दिली. आम्हाला हि बातमी दुसऱ्या सूत्रांकडून कळली. आणि असंवेदनशीलतेची हद्द पार करून हा ढोंगी गुरु दात काढून प्रवचन देत बसला स्टेज वर. बरं आता आमच्या "ब्रेन वॉश" ची सीमा ऐक, हे सर्व आमच्या डोळ्या देखत घडत असूनही आम्हाला गुरुजींचं हे वागणं विचित्र किंवा निंदनीय वाटलं नाही . का ? कारण 'गुरु हमेशा सही होता है ' असा आमचा करण्यात आलेला ब्रेन वॉश ! 


एवढं बोलून आता माझा कंठ दाटून आला होता. ह्या घटनेबद्दल ऐकून अभय चा चेहरा पडला होता. मला आता ह्यापेक्षा मोठं उदाहरण द्यायची गरज जर असेल गुरुजी ढोंगी आहेत हे सिद्ध करण्यासाठी  तर याहून मोठं दुर्भाग्य नाही.

"अजून काही सांगू ?" अभय काहीच बोलत नाही आहे हे बघून मी त्याला विचारलं.

तो काहीच न बोलता सोफ्यावरून उठला. हॉलच्या कोपऱ्यात जाऊन गुरुजींच्या फोटोकडे टक लावून पाहात उभा राहिला. काही क्षण तसाच उभा होता. आता त्यानं फोटो उचलला आणि फरशीवर पालथा पाडून त्यावर तो पाय देऊन उभा राहिला. माझ्याकडं पाहात त्यानं स्मितहास्य केलं. त्याच्या डोळ्यातून अश्रुंचे थेंब ओघळले. अभय आता खऱ्या अर्थानं "अभय" झाला आहे हे मी माझ्या डोळ्यासमोर बघत होतो.

आज परत एक पक्षी पिंजऱ्याबाहेर पडला होता.


➤➤➤➤

धन्यवाद !

डॉक्टर विजय






Comments

  1. Very Raw and Authentic!!!People always forget the actual message and gets attached to the messenger!! I remember analogy of "kulfi ki dandi" . You use it till you finish eating the "kulfi" and don't Decorate or carry that "dandi" life long (& Giving it the importance of God is madness)!

    ReplyDelete
    Replies
    1. इथे तर कुल्फी पण नकली होती 🙂

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

ब्रेन वॉश ( भाग १ )

ब्रेन वॉश ( भाग २ )