बिल्ला
तुम्ही कधी मारुती कार च्या बोनेट वर मर्सिडीज चा लोगो लावलेला बघीतलाय का? काही जण हौस म्हणून आपल्या कार वर महागड्या गाड्यांचे लोगो लाऊन मिरवतात. असं केल्यानं आपली गाडी मर्सिडीज कंपनी ची आहे असं लोकांना वाटेल आणि आपली शान वाढेल असा गोड गैरसमज करून घेतात बिच्चारे!
पण तसं काही होत नाही. गाडी खरंच महागडी आहे का हे तिच्यावर चिकटवलेल्या लोगोवरुन नाही तर तिच्या दिसण्यावरुन ओळखायला येतं. पण काही जण इतके कलंदर असतात कि ते कार ची रंगरंगोटी सुद्धा लक्झरी कार सारखी करुन ठेवतात त्यामुळे काही लोकांना ते फसवण्यात यशस्वी होतात. पण तरीही जे कार चे खरे जाणकार आहेत ते सहज ओळखू शकतात कि ही कार नकली आहे !
मी हे कारचं उदाहरण देऊन काय सांगायचा प्रयत्न करतोय हे तुमच्या मनात चाललं असेल, हो ना? तर मी आता स्पष्टिकरण करुन सांगतो.
हि तर झाली गाड्यांची गोष्ट. परंतु माणसंही गाड्यांसारखीच असतात. तुम्ही म्हणाल माणसांवर कुठं लोगो चिकटवलेले असतात? आठवा कधीतरी कुठंतरी तुम्ही माणसांवरही लोगो चिकटवलेला बघीतला असेल. आठवलं?
हो अगदी बरोबर. तेच म्हणायचं आहे मला. कोणत्या तरी सत्संगाचा किंवा गुरु महाराजांचा बिल्ला शर्टावर लावलेला माणूस नक्कीच कुठंतरी बघीतला असेल तुम्ही. मला खात्री आहे!
काय असतो हा बिल्ला? का बरं लावल्या जातो तो छाताडावर? आणि तो लावुन काय मिळतं? तर ऐका. फार मजेशीर विषय आहे हा! समजा तुम्हाला तुमच्या कंपनीची किंवा तुम्ही विकत असलेल्या प्रोडक्ट ची जाहिरात करायची आहे तर काय करावं लागेल? पोस्टर्स, मोठमोठे होर्डींग्स चौकाचौकात लावावे लागतील. पॅम्फलेट्स वाटावे लागतील. पेपरात टीव्हीवर जाहिरात द्यावी लागेल. आणखी काय करता येईल? हो! ऑटो रिक्षा आणि बसेस च्या पाठीमागे स्टीकर्स चिकटवावे लागतील. हो ना ? पण हे फार खर्चिक काम असतं. जेवढा खर्च प्रोडक्ट मैन्युफैक्चर करायला येत नाही त्याहून अधिक खर्च त्या प्रोडक्ट ची मार्केटिंग करण्यासाठी लागतो. कोणताही ऑटो रिक्षा वाला फुकटात तुम्हाला तुमचं स्टीकर त्याच्या ऑटोवर चिकटवू देणार नाही.
पण जर तुम्हाला त्या ऑटोवाल्या ला एक पैसा हि न देता तुमचं स्टीकर त्याच्या ऑटोवर चिकटवायचंच असेल तर? तर मग तुम्हाला त्याला "पटवावं" लागेल. त्याच्या फिलिंग्स आणि त्याच्या धार्मिक भावनांना जर तुम्हाला टच करता आलं तर तुमचं काम झालंच समजा! यासाठी तुम्हाला त्याला सांगावं लागेल कि बघ मी जे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोचवत आहे ते मी पैसा कमावण्यासाठी नाही तर लोकसेवेसाठी पोचवत आहे. हे प्रोडक्ट "प्रोडक्ट" नसून हे परमेश्वरानं मानवकल्याणासाठी पाठवलेलं वरदान आहे. आणि हे वरदान लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ईश्वरानं मला माध्यम म्हणून निवडलं आहे. आणि बघ तु जर या महान कार्यात आपलं छोटंसं योगदान देशील तर तुझंही कल्याण होईल.
जर तो ऑटोवाला तुमच्या गोष्टीत येऊन गेला तर तुमचं काम झालं ! तो लगेच तुमचं स्टीकर लावू द्यायला तयार होईल.
तर सांगायचा मुद्दा हा की हे जे सत्संगांचा बिल्ला लावलेली माणसं आणि बायका तुम्हाला दिसतात त्या बिचाऱ्यांना असंच गोष्टीत घेऊन पटवण्यात आलेलं असतं. त्यांना पुण्य आणि परमार्थाचं आमिष दाखवून त्यांच्या शरीराचा वापर ऑटो रिक्षा सारखा केल्या जातो. गुरुंचा आणि सत्संगांचा प्रचार केलातर गुरुकृपा होईल आणि जीवनाचं कल्याण होऊन मोक्ष मिळेल हे आमिष दाखवून ढोंगी गुरु आपला प्रचार प्रसार करुन घेतात. भोळी भाबडी माणसं त्यांच्या गोष्टीत येऊन गुरुंसाठी मरण्या मारण्या साठी पण तयार होतात.
पण बिल्ला लावल्यानं कोणी आध्यात्मिक होत नाही. जसं मारुती कार वर मर्सिडीज चा बिल्ला लावल्यानं ती काही लक्झरी कार होत नाही. शर्टावर किंवा ब्लाऊज वर बिल्ला लावला म्हणजे तो साधुसंतच झाला असं होत नाही. जसं कारच्या आवाजावरून लगेच ओळखता येतं कि हि महागडी कार नाही, तसंच ह्या खोट्या आध्यात्मिक लोकांनाही चटकन ओळखता येतं.
असो. शेवटी ज्याला जो बिल्ला लावायचा आहे तो लावावा. प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं. पण हे खरंच "स्वातंत्र्य" आहे का? यावर चिंतन व्हायला हवं.
~डाॅ. विजय
Comments
Post a Comment