ब्रेन वॉश ( भाग १ )
बऱ्याच दिवसांनी आज अचानक एका जुन्या मित्राची भेट झाली. सिग्नल वर थांबलो तर तो माझ्या शेजारीच उभा होता.
"अरे अभय कसं काय ? कुठे फ़िरतोयस ?" मी त्याला विचारलं.
"अरे मी सेंटर वर गेलो होतो सत्संग ऐकायला. तो बोलला. आणि तु का बरं येत नाहीस आता श्रवणाला ?" त्याचा प्रश्न.
मी सिग्नल कडे पाहिलं तर सिग्नल हिरवा व्हायला २८ सेकंद शिल्लक होते. आता त्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर २८ सेकंदात देता येणं शक्य नव्हतं. त्याचा प्रश्न सहज असता तर फक्त स्माईल देऊन निघून गेलो असतो. पण प्रश्न विचारताना त्याच्या डोळ्यात तीच उत्सुकता होती जी दहा वर्षांपुर्वी त्याच्या डोळ्यात होती. दहा वर्षांपुर्वी मीच त्याला त्या सत्संगाचा रस्ता दाखवला होता. म्हणून मी त्याला म्हटलं "चल आपण चहा घेऊयात. सविस्तर बोलणं पण होईल आपलं."
त्यानं आनंदानं होकार दिला. सिग्नल सुटला आणि आम्ही जवळच एका हॉटेलात जाऊन बसलो.
⧫⧫⧫
"जवळपास चार-एक वर्षांनी भेटतोय ना आपण ?" त्यानंच सुरुवात केली संभाषणाला.
"अरे हो ना झालेच असतील मला ४ वर्ष सत्संग सोडून." मी.
"बरं सांगतोस का, तू का बरं येत नाहीस आता सत्संगात? पोचला वगैरे कि काय तू परमेश्वरा पर्यंत? " असं बोलून तो खदाखदा हसायला लागला.
त्याच्या त्या हसण्यात गंमत तर होतीच पण एक ईर्ष्या देखील होती. आपला मित्र आपल्या समोर निघून गेल्याचा आनंद तर असतोच पण कुठंतरी "हा खरंच माझ्या आधी आपल्या ध्येया पर्यंत पोचला तर नसेल ना?'' हि ईर्ष्येची भावना देखील उपस्थित असते मनात. मानवी मन खूप कॉम्प्लेक्स असतं !
त्याला खरंच माझ्या न येण्याचं कारण जाणून घ्यायचं असतं किंवा माझ्या सत्संग सोडण्यामुळे माझं कसं होईल हि काळजी असती तर खूप आधीच त्यानं भेट घेऊन किंवा फोन करून माझी खबर घेतली असती. पण कदाचित "बरंच झालं मागे पडला" असं हि वाटलं असेल त्याला मनातून. शेवटी अध्यात्मात येऊन हि काय करतात लोकं ? तीच शर्यत लागलेली असते जी संसारात असते. कोण जास्त सेवा करतो , कोण जास्त साधना करतो, कोण गुरुजींचा आवडता शिष्य बनून दाखवतो, हीच चढाओढ तिथेहि !
मी पोचलो कि नाही ते नंतर सांगेन. पण तू अजूनही सत्संगात जातोयस याचा अर्थ तू अजून हि पोचला नाहीस हे नक्की ! हो ना?
माझ्या प्रश्नानं त्याला सुचेनासं झालं काय उत्तर द्यावं ते. थोडा गोंधळला तो. उत्तराची डोक्यात जुळवाजुळव करत त्यानं वेटर ला हाक मारून बोलावलं. "काय घेशील तू ? चहा कि कॉफी? " त्यानं मला विचारलं.
"मला काहीपण चालतं आता. तू बघ तुझ्या गुरुजींची आज्ञा काय आहे ते. " मी मुद्दामच त्याची खोडी काढत बोललो.
"चहाच घेऊयात " असं बोलून त्यानं माझ्या खोचक बोलण्या कडे दुर्लक्ष केलं. "दोन चहा घेऊन ये स्पेशल" त्यानं वेटर ला ऑर्डर दिली.
संभाषण कंटिन्यू करत तो बोलला, " अरे इतकं सोपं असतं का पोचणं ? गुरुजींची कृपा होईल तेव्हाच शक्य आहे ते." "ग्रेस इज द ओन्ली वे."
"अरे पण आता दहा वर्षे झालीत न तुला सत्संगात? अजून पर्यंत कृपा झालीच नाही का?" मी चिडवल्यासारखा प्रश्न केला.
"सगळी काही कृपाच आहे रे. न पोचणं हि कृपाच आहे, आजच्याच प्रवचनात बोललेत गुरुजी. आणि खूप पात्रता लागते ज्ञाना साठी. अजून माझी पात्रता झाली नाही तेवढी."
त्याचं ते उत्तर अपेक्षितच होतं मला. प्रश्न कोणताही असो, उत्तर तयार करून दिलेले असतात गुरुजींनी. समोरच्या माणसाला सुंदर आणि गोलगोल उत्तर देऊन संभाषण जिंकण्यात गुरुजी पटाईत आहेत आणि शिष्यांना पण तसंच ट्रेनिंग देतात. मला सगळे डावपेच माहित आहेत कारण मी हि त्याच गुरु चा चेला होतो!
मी त्याला पुढला प्रश्न केला. "तू पात्रतेचं बोललास. पात्रता म्हणजे काय रे? म्हणजे पात्रता तयार झाली हे कसं सिद्ध होईल आणि पात्रता तयार झाली कि नाही हे कोण ठरवणार?"
"अर्थातच ते गुरु ठरवतील" क्षणाचाही विलंब न करता त्यानं उत्तर दिलं. "जेव्हा आपल्या मनाच्या वृत्ती आणि कामक्रोधादि विकार गळून पडतील, आपलं मन अकम्प, प्रेमळ, निर्मल आणि आज्ञाकारी होईल तसेच आपल्या मनात कुणाविषयी द्वेष नसेल, आपल्या बद्दलही कुणाच्या मनात द्वेष नसेल, आपल्या मुळे कुणाचं मन दुखणार नाही, एवढी काळजी जर घेता आली आणि गुरूंनी दिलेली प्रत्येक साधना ईमानदारीने केली तसेच सत्याचा प्रसार प्रचार करण्याची सेवा घडली म्हणजे आपोआपच पात्रता तयार होते. आजच्याच प्रवचनात बोललेत गुरुजी !"
तेवढ्यात वेटर चहा घेऊन आला. चहा टेबल वर ठेवता ठेवता वेटर च्या हातून चुकून एक कप गलंडला आणि चहा माझ्या अभय च्या अंगावर सांडला. एका क्षणात तो किंचाळला आणि वेटर च्या अंगावर धावून गेला. दोन चार शिव्या हि घातल्या त्याला. वेटर बिचारा सॉरी सर सॉरी सर करत गयावया करू लागला आला. माझ्या मित्राच्या शर्टावर पडलेले डाग पुसता पुसता तो माफी मागत होता. पण आमच्या साहेबांचा पारा काही केल्या उतरत नव्हता. मी ते सगळं गंमतीनं बघतोय हे लक्षात येताच तो जरा शांत झाला.
शरमल्या सारखा चेहरा करून त्यानं चेहऱ्या चे हावभाव नॉर्मल करत माझ्या कडे बघितलं आणि स्पष्टीकरण द्यायला सुरवात केली. " अरे हा सहज प्रतिसाद होता, गुरुजी अश्या घटनांतून आपली परीक्षा घेतात."
"हो, बरोबर. आणि तू ह्या परीक्षेत फेल झालास" मी चहा चा घोट घेत बोललो. चहा खरंच खूप मस्त झाला होता.
माझं बोलणं त्याच्या चांगलंच जिव्हारी लागलं असेल. पण तसं न दाखवत तो बोलला, " नाही रे फेल नाही झालो.
मी अजून प्रोसेस मध्ये आहे. गुरुजींसारखा स्थितप्रज्ञ व्हायचो आहे अजून. पण पूर्वी पेक्षा बेटर आहे. अध्यात्मात यायच्या आधी तर असं काही घडलं म्हणजे दोन कानाखाली वाजवायचो मी."
गुरुजी किती "स्थितप्रज्ञ " आहेत हे फक्त मलाच माहित होतं. कारण मी गुरुजींना ह्या माझ्या भाबड्या मित्रा पेक्षा हि जास्त हादरलेलं आणि बिथरलेलं बघितलं होतं, पण ह्या मुर्खाला अजून तशी प्रचिती आलेली नव्हती. आणि मला त्याचा हा भ्रम तोडायचा नव्हता. कारण बरेचदा भ्रमातच आनंद असतो. ज्ञान नाही, तर बरेचदा अज्ञानच माणसाला जगण्यास मदत करतं. कॅन्सर चा पेशंट जोपर्यंत त्याला झालेल्या आजाराबद्दल अज्ञानात असतो तोपर्यंत तो तेवढा त्रासात नसतो. पण ज्यावेळी त्याला हे ज्ञान होतं कि त्याला कॅन्सर झाला आहे तेव्हा मात्र तो जास्त खचायला लागतो.
आपण वेटर ला दिलेली प्रतिक्रिया कशी न्यायसंगत होती ह्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत तो पुढं बोलला, "अरे या जगात अगदीच साधं भोळं वागून चालत नाही. लोकं गैरफायदा उचलतात. म्हणून थोडं कडक पण वागता यायला हवं. "
तेवढ्यात चहाचा दुसरा कप घेऊन वेटर आला. "चहा घे आधी , खूप मस्त बनलाय चहा. मी तर अजून एक कप घेणार. " असं म्हणत मी वेटर ला आणखी एका चहाची ऑर्डर दिली.
माझ्या मित्रानं कप टेबल वर तसाच राहू देत डोळे मिटून घेतले आणि ध्यान मुद्रा लावून एका मिनीटात डोळे उघडले.
मी त्याला विचारलं," कोणतं ध्यान केलंस रे ?"
"क्षमा ध्यान, आता मी त्या वेटर ला उग्र प्रतिसाद देऊन त्याला दुखावलं न, तर माझ्या मनावर एक कर्मबंधनाची रेघ उमटली. ती रेघ मला मोक्ष मिळण्यात अडथळा ठरेल. तो अडथळा दूर व्हावा म्हणून मी क्षमा साधना केली. गुरुजींचीच आज्ञा आहे तशी."
"अरे तर मग तू प्रत्यक्ष माफी माग न त्याची . त्यानं कशी लगेच माफी मागितली तुझी?"
आता हा आपल्याला कैचीत पकडणार ह्याचा अंदाज माझ्या मित्राला आलेला होता. गोष्ट गोल गोल घुमवत तो बोलला, " नाही रे, अशी मनातल्या मनात मागितली क्षमा तरी चालतं. शेवटी सगळे एकच आहेत. सर्वांच्या आत सतगुरुं चाच वास आहे, ईश्वराचा वास आहे. "
देवा! किती रे हा पाखंडीपणा ! मी मनात म्हटलं.
"बरं आता तू सांग. तू दुसऱ्या गुरूंकडे जातोस असं कानावर आलं होतं माझ्या. खरंय का?" मित्र बोलला.
"दुसरा" गुरु ? मी आश्चर्य दाखवत विचारलं. " गुरु तर एकच असतो न रे?"
त्याच्याच भाषेत प्रतिप्रश्न केला मी.
"तसं नाही रे, म्हणजे दुसऱ्या सत्संगात जातोस का?" प्रश्न एडिट करून तो माझ्या तोंडाकडं बघत होता.
"हो, मी ह्या संसाररूपी सत्संगात जातो आता. हे जग माझा गुरु आहे. प्रत्येक क्षण जगतो जसा आला तसा. हसतो. रडतो. रुसतो. भांडतो. झोपतो. खातो. मनोरंजन करतो. फिरतो. कधी कुणाची मदत करतो. कधी कुणाला मदत मागतो. कधी कुणाची मस्करी करतो. कधी कुणाच्या दुःखात सहभागी होतो. एकंदरीत अगदी साधं जगतो. ऑर्डीनरी."
चहा चा घोट घेत तो माझं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता.
"पण आता काही गोष्टी अगदी स्फटिका सारख्या स्पष्ट झाल्यात मला. व्यक्ती कधीच कोणत्या गुरु च्या सानिध्यात राहून रूपांतरित होऊ शकत नाही. फक्त रूपांतरित झाल्याचं ढोंग करू शकतो. कोणताच गुरु तुम्हाला सत्या पर्यंत पोचवू शकत नाही कारण ज्याचं त्याचं सत्य ज्याचं त्यालाच शोधायचं असतं. 'गुरु फक्त मार्ग दाखवतात' ह्या विधानाचं हि मी खंडन करतो कारण स्वतः ला गुरु म्हणवून घेणारा माणूस कधीच खऱ्या अर्थाने गुरु नसतो. तो ढोंगी असतो. तुम्ही ज्याला "सत्संग" म्हणता ते निव्वळ मनोरंजनाचं साधन आहे. सिनेमा बघतात, टीव्ही पाहतात, व्हिडीओ गेम खेळतात तसंच मनोरंजनासाठी लोकं सत्संग करतात. पण आपण सत्याचा शोध घेऊन परमार्थ साधतोय असा खोटा दिलासा मनाला दिल्या जातो. आजवर कुणीच काम-क्रोध आदी विकारांतून मुक्त झालेलं नाही. आणि खरं म्हणजे त्यातून मुक्त व्हायची गरज हि नाही. जे तुम्हाला विकारांतून मुक्त व्हायला शिकवतात ते स्वतःच विकारांनी लिप्त असतात."
एवढं बोलून मी त्याच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो.
काही क्षण तो माझ्याकडे टक लावून बघत होता. तो आता मला जज करतोय हे कळत होतं मला. मी खूप दिवसांपासून प्रवचन ऐकलं नाही, सेवेत गेलो नाही त्यामुळे माझ्या चेतने चा स्तर खालावलाय, असा विचार तो करत होता. कारण त्याच्या गुरुजींची तशी शिकवणच होती कि जर एखादा साधक बरेच दिवस सत्संगापासून दूर राहिला तर त्याची चेतना खालावते. अशा खालावलेल्या चेतने च्या लोकांसोबत वावरतांना ते सतत जज करत असतात समोरच्याला. एक प्रकारची अस्पृश्यताच पाळली जाते. अशा लोकांशी बोलताना त्यांना वेगळीच विकृत संतुष्टी मिळत असते. आपण किती उच्च चेतनेचे आहोत आणि हा बिचारा किती मागासलेल्या चेतनेचा आहे असा सूक्ष्म अहंकार त्यांच्या मनात दडलेला असतो.
मी ह्या लोकांच्या मानसिकतेचा दहा वर्ष अभ्यास केला असल्याने मला स्पष्ट कळत होतं त्याच्या मनात काय चाललंय ते. आणि खरंच त्याच्या बोलण्यातुन ते सिद्ध झालं. आता तो बोलता झाला...
"तू असा बोलतोयस कारण तुझं सत्याचं श्रवण बंद आहे. तुझा अहंकार वाढलाय. तुझं मन तुला भ्रमात ओढतंय. तू साधनेतून पथभ्रष्ट झालायस. म्हणून म्हणतो कि तू श्रवण बंद करायला नको होतं. अरे तू किती प्रगत साधक होतास, सगळे तुझ्याकडे आदर्श म्हणून बघायचे. मी तुझ्या सांगण्यानंच अध्यात्मात आलो होतो. पण तु अशी अर्धवट साधना सोडली त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तु खरं खरं सांगशील का तुझ्या ह्या निर्णयाचं कारण?"
"हो, मला आठवतं कि मीच तुला सत्संगात जॉईन व्हायला सांगितलं होतं. तेव्हा तू चटकन माझ्यावर विश्वास ठेऊन आला होतास, पण आता तु माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस . कारण तू तुझा विश्वास गुरूंना सोपवलास. तुझा प्रत्येक निर्णय गुरूंच्या आज्ञेच्या चौकटीत राहून असतो. तू तुझं स्वातंत्र्य गुरूंना सोपवलंय. तुझी बुद्धी , तुझी तर्कशक्ती तू गुरूंच्या पायाखाली अर्पण केलीस, आता तुझ्या गुरूनं दिलेल्या चौकटीत न बसणारी प्रत्येक गोष्ट तु कंप्युटर मध्ये आलेल्या एखाद्या वायरस सारखी उडवून लावतोस. कोणी कितीही तर्कसंगत प्रश्न केला तरीही तुझं उत्तर गुरूंच्या शिकवणीनं रंगवलेलं असतं. तू आपल्या जीवनाची कमान पूर्णपणे गुरु च्या हाती दिली आहे आणि ह्या गोष्टीचा तुला अभिमान आहे, ह्यापेक्षा वेगळं पारतंत्र्य ते काय असतं रे? गुरु म्हणतील तीच पूर्वदिशा , गुरु म्हणतील तेच सत्य हे तुझ्या मनावर बिंबवण्यात आलंय आणि ते तू खुशीनं होऊ दिलं ह्यापेक्षा मोठी गुलामी कोणती? हे सगळं ऐकत असताना आता ह्याक्षणी सुद्धा तू प्रत्येक वाक्य त्याच फूटपट्टीनं मोजून बघतोय जी गुरुनं ठरवून दिली आहे. तुझं मन, तुझी बुद्धी हे तुझे शत्रू आहेत हा "ब्रेन वॉश " यशस्वीपणे करण्यात आलाय. सगळं जग मायावी असून फक्त गुरूच एक सत्य आहे हा ब्रेनवॉश तुझा करण्यात आलाय. एवढंच काय तर जर कोणी तुझा हा ब्रेनवॉश दूर करायचा प्रयत्न करत असेल तर तोच तुझा ब्रेनवॉश करत आहे असं तुला वाटेल ह्याची संपूर्ण प्रोग्रामिंग करुन ठेवण्यात आली आहे तुझी. आणि हि प्रोग्रामिंग किंवा संमोहन एकाच दिवशी नाही झालंय. हळू हळू, स्टेप बाय स्टेप तशी व्यवस्था करण्यात आली. तुझा मेंदू केव्हा तुझ्या ताब्यातून गुरु च्या ताब्यात गेला हे तुला हि कळलं नाही. बरं तुझा ब्रेनवॉश झालाय हे नुसतं तुझ्या लक्षात येऊन हि तू काहीच करू शकत नाही, कारण तो ब्रेनवॉश गोंडस आणि सुंदर दिसावा ह्याची पण व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे. मुक्ती चं आमिष दाखवून तुझी मुक्तीच त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली आहे. तू गुरूंवर शंका पण करू शकत नाहीस. शंकेचा विचार मनात येताच तुझ्या मेंदूतल्या फाईल्स ऍक्टिव्हेट होतात आणि "श्रद्धा विश्वास " चा हवाला देऊन तुझ्या तर्क बुद्धी ला तिथेच रगडून टाकतात. खरं म्हणजे तू आतून घाबरलेला आहेस. तू अनेक गोष्टींना घाबरलेला आहेस. नव्हे! तुला घाबरवण्यात आलंय, तेही अगदी पद्धतशीर पणे! तू अपयशाला घाबरतोस, गुरूंची अवकृपा झाली तर माझा मोक्ष राहून जाईल या गोष्टीला घाबरतोस, मृत्यू नंतर मी खालच्या स्तरावर म्हणजे नरकात वगैरे तर फेकला जाणार नाही न या गोष्टी ला तू घाबरतोस, गुरूंवर शंका घेतली तर माझी अधोगती तर होणार नाही न या गोष्टीला घाबरतोस. एकंदरीत तू स्वतःच्याच मन आणि बुद्धीला घाबरतोस. निसर्गानं तुला दिलेली बुद्धी तू दुसऱ्या च्या हाती सोपवली आहे. माझ्याही सोबत हेच झालं होतं. पण सुदैवानं मी बचावलो. " मी एका दमात बोलून तर दिलं पण वाटलं कि त्याला ओव्हरडोज तर नाही दिला मी?
तो काहीसा आश्चर्यानच माझ्याकडं पाहत होता. कदाचित "ब्रेन वॉश" शब्द त्याला झोंबला होता. तो आता पुढली खेळी काय खेळणार हे पण मला माहित होतं. "माझा ब्रेन वॉश नाही झालाय" आता हे सिद्ध करायचा प्रयत्न तो करेल ह्याचा मला अंदाज होता. कारण गुरुजींनी ती पण व्यवस्था करून ठेवलेली असते. सगळं जग तुमचा ब्रेन वॉश करत असतं परंतु गुरु तुमचा ब्रेन "क्लीन" करून देतात अशी गोष्ट शिष्यांच्या मेंदूत आधीच रुजवलेली असते. त्यामुळे जर कुणी ह्या शिष्यांच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला तरी तो निष्फळ ठरतो. काहीही झालं तरी गुरु वर शंका यायलाच नको आणि आलीच तरी ती लगेच डिफ्युज केली जाते अशी व्यवस्था गुरु आधीच करून ठेवतात.
आता त्याची पाळी होती. " असं पण होऊ शकतं न कि तू जे म्हणतोय तो तुझा गैरसमज असेल." त्यानं माझ्यावर प्रश्न आणि शंकेचा चेंडू फेकला.
"मी जे बोलतोय ते मी माझ्या अनुभवांच्या आधारावर बोलतोय. तर्काचा वापर करून आपण स्वतःच पारखू शकतो की समोरचा जे सांगतोय ते किती खरं किती खोटं असेल."
"उदाहरणार्थ ?" त्यानं कपाळावर आठ्या आणत विचारलं."
"उदाहरणार्थ, जर मी तुला म्हटलं कि ह्या कपात चहा नसून कॉफी आहे. तर तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवशील का? नाही ना? तू म्हणशिल कि मला आधी टेस्ट करून बघू दे, म्हणशील न ?"
त्यानं होकारार्थी मान हलवली.
"जर मी म्हटलं कि मी डॉक्टर नसून इंजिनिअर आहे. तर तू काय म्हणशील?" मी परत विचारलं.
" मी म्हणेल कि डिग्री सर्टिफिकेट दाखव. मी विश्वास ठेवणार नाही" तो बोलला.
"करेक्ट! म्हणजे मी जे सांगतोय ते तू अगदी डोळे मिटून स्वीकारणार नाहीस. हो ना?"
"हो"
"तर मग गुरु जे सांगतात त्यावर तू कसा विश्वास ठेवतोस? तू कधी विचारलंस का त्यांना कि तुम्ही परलोकाच्या (मृत्यू उपरांत जीवनाच्या ) गोष्टी सांगता तर तुमच्या कडे काय पुरावा आहे? जर खरंच तुम्ही मृत्यू-लोकाशी संपर्क करु शकता तर माझ्या दिवंगत आजोबांना त्यांचं नाव काय होतं ते विचारून सांगा बरं. विचारलंस का कधी तू असं गुरूंना ?"
ह्यावेळी त्यानं नकारार्थी मान हलवली.
"त्यांनी तुला मोक्षाची व्याख्या तर दिली परंतु ते स्वतः त्या व्याख्येत बसतात का ह्याची कधी परीक्षा केलीस का तू? ते म्हणतात कि मोक्ष मिळालेला माणूस अहंकारातून मुक्त झालेला असतो. तर तू कधी चेक केलं का त्यांचा अहंकार खरंच मिटला आहे का ते? साधारण माणसा सारखं त्यांना भाजीपाला आणायला बाजारात जाताना बघितलंस का तू कधी? आधार कार्डाच्या किंवा बँकेच्या रांगेत उभं असताना बघितलं का? नाही ना ?"
"ते म्हणतात मुक्त पुरुष कोणत्याही परिस्थितीत समभावात स्थापित असतो. त्याला क्रोध येत नाही. तो अकम्प असतो. तर तू कधी त्यांच्या अंगावर चहा फेकून बघितला का? त्यांच्या मुलीला कुणी पळवून नेलं तर ते बिलकुल विचलित होणार नाहीत का? "
"तुला प्रत्येक घटना स्वीकार करायला सांगतात ते, परंतु त्यांच्या किंवा त्यांच्या फॅमिली च्या जीवाला धोका झाला तर ते स्वीकार करतील का?"
माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतंच कदाचित. म्हणून त्यानं परत मलाच प्रतिप्रश्न केला.
"बरं मग तू केली का त्यांची परीक्षा" मित्रानं मलाच प्रश्न केला.
"होय, मी केली परीक्षा आणि ते परीक्षेत फेल झालेत. खरंतर मी सुरुवातीलाच करायला हवी होती परीक्षा. पण आपल्या संस्कृतीत गुरुं वर शंका करणं पाप समजलं जातं. अपमान नको म्हणून मी ते जे सांगतील ते खरं मानत गेलो. आणि सगळे तेच करतायत. मी त्यांना त्यांच्याच शिकवणीच्या विरुद्ध आचरण करताना बघितलं आहे. मी त्यांना अनैतिक गोष्टींत सहभागी होताना बघितलंय. मी त्यांना चिडलेलं बघितलंय . मी त्यांना पॉलिटिक्स करताना बघितलंय. मला माहित आहे हे सगळं तुला खोटं वाटेल पण मला यातून काहीही सिद्ध करायचं नाहीये. मला हे पण माहित आहे कि अंधविश्वास असेल तोपर्यंत शिष्यांना गुरूंच्या अशा वागण्यावरही आपत्ती नसते. "गुरूंचीच लीला आहे हि" असं म्हणून ते ह्या गोष्टिंवरही डोळेझाक करून घेतात. असो. तू गुरूंकडे जायचं कि नाही जायचं हे तू ठरव. "
मी एवढं बोलून थांबलो. तो हि स्तब्ध झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन स्पष्ट दिसत होतं. तो माझ्या गोष्टींनी कन्विन्स नव्हता झाला पण काही प्रश्नांनी तो नक्कीच व्याकुळ झालेला वाटत होता. त्याच्या आतमध्ये चलबिचल सुरू झाली होती. काहीच न बोलता त्यानं वेटर ला बिल घेऊन येण्याचा ईशारा केला.
मी बिल दिलं आणि म्हटलं, "चल निघुयात आता. बरं वाटलं तुझ्याशी बऱ्याच दिवसांनी भेटून. "
"ठीक आहे." म्हणत त्यानं हलकीशी स्माईल दिली.
आम्ही दोघंही हॉटेल च्या बाहेर निघालो. मी "बाय " करून मोटरसायकल स्टार्ट केली. पण त्याचा चेहरा उतरलेला बघून मीच त्याला विचारलं "का रे ? राग आला का माझ्या गोष्टी ऐकून?"
"नाही यार, पण मला वाटतंय आपण परत एकदा या विषयावर चर्चा करायला हवी. काहीतरी अर्धवट राहून गेल्या सारखं वाटतंय. आपण परत भेटायचं का?"
"बघ, आज आपण अचानक योगायोगानं भेटलो. विषय निघाला म्हणून मी एवढं बोललो. पण खरं सांगू मला ह्या विषयावर वाद विवाद करणं आवडत नाही. पण तुझे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच बोलू. तू मला केव्हा हि फोन कर. आपण भेटूयात. "
तो हसत बोलला, " मी फोन करेन तुला येत्या रविवारी. चालेल? "
"हो नक्कीच" एवढं बोलून मी त्याचा निरोप घेतला.
( भाग दुसरा लवकरच प्रकाशित होईल )
वेळ काढून वाचल्या बद्दल धन्यवाद!
Beautifully Explained!! waiting for part 2!!
ReplyDeletethank you dear!
DeleteSir hindi m b likho
ReplyDeleteजी जरूर !
DeleteExcellent!! This skinders should oftenly encountered for brain wash. Thanks for bold step to publish.
ReplyDeletethanks dear Utkarsha. your words inspires me!
DeleteBeautiful blog dear besty.keep it up😊😊
ReplyDeletethank u Bestie
Deleteप्राणीक हिअलिंग वर काही लिहा. संदीप माहेश्वरी बद्द्ल काही लिहा.
ReplyDeleteप्राणिक हीलिंग बद्दल एका वाक्यात सांगतो. त्यांना म्हणायचं हीलिंग झाल्यानंतर पैसे देऊ, मग बघा हीलिंग करतात का ते.
Deleteसंदीप माहेश्वरी चे लेक्चर्स ऐकून संदीप माहेश्वरी इतकंच सक्सेसफुल झालेल्या ५ जणांची नावं सांगा. मग मी संदीप माहेश्वरी बद्दल पण लिहीन.
Delete