दांभिकांचा कळप - टीजीएफ ( भाग १)

"दांभिक" (hypocrite) म्हणजे अशी व्यक्ती जिच्या कथनी आणि करणी मध्ये अंतर आहे विसंगती आहे. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती स्वतःला सत्यवचनी आणि सत्यप्रेमी असल्याचा दिखावा करत असेल , तसा दावा करत असेल, मात्र त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात खोटारडेपणा व्यक्त होत असेल तर ती व्यक्ती  दांभिक आहे असं म्हटल्या जातं. "ढोंगी" "खोटारडा" "डबल स्टॅंडर्ड" "पाखंडी" हे इतर अर्थ. 

अश्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपण रोजच बघतो. व्यावहारिकता म्हणून खोटं बोलावं लागतं , कपट करावं लागतं , १०० टक्के खरं बोलणं शक्यच नाही असं म्हणून आपलं वागणं न्यायसंगत कसं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केल्या जातो. ते बहुतांशी व्यावहारिक आहे, स्वीकारार्ह आहे, परंतु जे लोक स्वतःला सत्याचे प्रचारक म्हणूनच समाजात मिरवत असतात निदान त्यांच्या कडून तरी अशा वागण्याची अपेक्षा नसते.  विशेषतः स्वतःला धार्मिक किंवा अध्यात्मिक म्हणवून घेणारे लोकं स्वतः खूप खोटारडे आणि दांभिक असतात असा मला गेल्या १५ वर्षात बराच प्रत्यय आला. 

माझ्या १५ वर्षांच्या अध्यात्मिक यात्रेत मी खूप साऱ्या अध्यात्मिक संस्था आणि त्यांच्या शिकवणींचा अभ्यास केला, जवळून तिथल्या लोकांच्या संपर्कात आलो. त्यापैकी एक म्हणजे टीजीएफ नावाची अध्यात्मिक संस्था जिथं मी १०-१२ वर्ष जुळून होतो. मी त्या संस्थेत "सत्याचार्य" म्हणून सेवा द्यायचो. सत्याचार्य म्हणजे सत्य ज्याच्या आचरणात अभिव्यक्त होत आहे अशी व्यक्ती. (म्हणजे निदान तसा अर्थ अपेक्षित आहे, पण खरंच आमच्या आचरणात सत्य होतं कि नाही हे मी पुढे लिहणारंच आहे) 

तर ह्या संस्थेचा मुख्य आणि प्रथम दावाच असा आहे कि आम्ही तुम्हाला अंतिम सत्य काय आहे ते सांगू, त्याला ते "तेज सत्य" असं गोंडस नाव देतात. ह्या संस्थेचे संस्थापक गुरुजी असा दावा करतात कि श्रीकृष्ण , भगवान बुद्ध , कबीर, गुरु नानक , मोहम्मद पैगंबर ज्या अंतिम सत्याला अनुभवाने जाणत होते तेच अंतिम सत्य हे गुरुजी आपल्या अनुभवाने जाणतात. १५ ऑगस्ट १९९७ ह्या दिवशी त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आणि त्यांना मोक्षप्राप्ती झाली असा परिचय त्या गुरूचा करून दिल्या जातो. आणि श्रवण मार्गाने  म्हणजेच त्यांची प्रवचनं ऐकून मोक्ष / आत्मसाक्षात्कार/ महानिर्वाण प्राप्त केल्या जाऊ शकतं असा दावा ते करतात. त्यासाठी तुम्हाला काही आवश्यक अटींची पूर्तता करावी लागेल असं वचन ते प्रत्येक साधकाकडून पहिल्याच दिवशी घेतात. त्या अटी कोणत्या? 

पहिली अट म्हणजे तुम्हाला त्यांचे सर्व शिवीर  न चुकता ऐकावे लागतील. (एका पाठोपाठ एक असे अनेक शिवीर असतात सिलॅबस मध्ये, शेवटचं शिवीर कोणतं हे कधीच सांगितल्या जात नाही, वर्षानुवर्षे करत रहा शिवीर!)

दुसरी अट , शिविरा मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जातील त्या तुम्ही शिविराबाहेर इतर लोकांशी शेअर करू नये. 

तिसरी अट , आश्रमात म्हणजेच शिविरात तुम्हाला सेवा (श्रमसेवा / धनसेवा म्हणजे डोनेशन) द्यावी लागेल.  

चौथी अट ,  गुरूंच्या प्रत्येक आज्ञे चं तुम्हाला पालन करावं लागेल. ( हि अट म्हणजे "मास्टर अट" आहे कारण मग पुढे  गुरुजी जे जे फर्मान सोडतील ते तुम्हाला करावं लागेल. ) 

पाचवी अट , गुरूंवर अटळ विश्वास ठेवायचा, शंका घ्यायची नाही, प्रतिप्रश्न करायचे नाही, आलोचना करायची नाही. गुरूंच्या वचनांवर अविश्वास दाखवायचा नाही. 

वरील सर्व अटींची पूर्तता करू शकलात (आणि जर गुरूंची कृपा झाली ) तर तुम्हाला ह्याच जन्मात मोक्ष प्राप्ती होईल.  परंतु तुम्ही धीर ठेवायचा ! सारखं सारखं विचारायचं नाही कि मला अंतिम ज्ञान केव्हा मिळेल ? ह्या जन्मात समजा नाहीच मिळालं तरी धीर सोडायचा नाही, मेल्यानंतर स्वर्गात (त्याला हे पार्ट २ असं नाव देतात) सुद्धा गुरुजी सूक्ष्म रूपाने तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत ! असा दावा ते करतात. 

हि वचनं गुरुजींना दिल्यानंतर सुरु होतो तुमचा प्रवास !... अध्यात्मिक प्रवास! हा प्रवास करताना तुम्हाला बऱ्याच नियमांचं पालन करणे पण अनिवार्य राहील अशी आधीच सूचना केली जाते. हे नियम कोणते ? तर इतरांची गीता वाचायची नाही अर्थात इतरांना जज करायचं नाही, अनुमान लावायचं नाही, तर्क करायचा नाही, खोटं बोलायचं नाही, श्रवण म्हणजे सत्संग ऐकणं बंद करायचं नाही, ध्यान करायचं, सेवा करायची, गुरुजींच्या पुस्तकांचा प्रचार प्रसार करायचा, प्रत्येक महिन्याला प्रकाशित झालेलं पुस्तक विकत घेऊन वाचायचं, ऑनलाईन श्रवण करायचं, आपण केलेल्या कोणत्याच कामाचं श्रेय घ्यायचं नाही (कारण सर्व काही ईश्वर करतो आहे आणि तुम्ही अकर्ता आहात ) लेबलिंग करायची नाही अर्थात नावं ठेवायची नाहीत, मी पणा सोडून द्यायचा , गुरूंच्या शिकवणींचा उपहास करायचा नाही,  चुगल्या करायच्या नाहीत.  

वरकरणी बघता वाटेल कि चांगलेच तर आहेत हे नियम, चांगल्या गोष्टीच तर करायला सांगितल्या आहेत, मग त्यात वाईट काय? गोष्टी तर चांगल्या सांगितल्या जातात परंतु त्या कोणीच पालन करताना दिसत नाहीत, किंबहुना त्यापैकी बरेच नियम हे मानसशास्त्राला अनुसरून नाहीत. तर्क करू नका, बुद्धी वापरू नका कारण तर्क आणि बुद्धी हि अंतिम सत्य प्राप्त करण्यात अडथळा निर्माण करते असं गुरुजी सांगतात. तर्क बुद्धी गुरूंच्या चरणी समर्पित करायला लावली जाते, भक्तांनी बुद्धी वापरायची नाही ! मात्र गुरुजी वापरतील, भक्तांना ते जज पण करतील, पारखतील आणि ते ठरवतील कि कुणाच्या भक्तीचा स्तर कमी आहे किंवा जास्त आहे! 

नैतिकता , माणुसकी , अध्यात्मिकता शिकवणारी हि संस्था दांभिकतेचा कळस गाठताना दिसते. साधी राहणी साधं जीवन आणि काटकसर शिकवणारे गुरुजी मात्र स्वतः एखाद्या सेलिब्रिटी ला लाजवेल असं जीवन जगतात, आलिशान कार मध्ये बसून आश्रमात येतात.  प्रेम आणि नैतिकता शिकवतात मात्र ह्यांचे शिष्य अहंकारी, क्रोधी, बदलेखोर स्वभावाचे आहेत. माणुसकी शिकवली जाते परंतु माणुसकी ला लाजवेल असं वर्तन इथल्या साधकांचं आहे. जोपर्यंत तुम्ही संस्थेशी जुळलेले आहेत, जोपर्यंत तुमचा संस्थेला उपयोग आहे तोपर्यंत तुमच्याशी छान वागतात, रिस्पेक्ट देतात, घरी कार्यक्रम असल्यास आदराने जेवायला बोलावतात, तुमचे गुणगान गातात. परंतु जेव्हा तुम्ही संस्थेच्या काहीच कामाचे नास्ता तेव्हा ते तुम्हाला विसरावून जातात, वाळीत टाकतात , बहिष्कृत करतात, तुम्ही पथभ्रष्ट साधक आहात असा दुष्प्रचार तुमच्या माघारी करतात. एवढंच नाही तर तुम्ही कधी योगायोगानं त्यांच्या समोर गेलात तर ते तुमच्या कडे बघून न बघितल्यासारखं करतात. ह्यावरूनच अंदाज येतो कि त्यांच्या गुरुजींची माणुसकी ची शिकवण किती आचरणात आहे त्यांच्या. 

आमची सत्संग केल्यानंतर तुमच्या जीवनाचा पांचही स्तरावर विकास होईल असा दावा ते करतात, शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि अध्यात्मिक अशा पाच स्तरांवर उच्चतम विकास करण्याचा दावा ते करतात, परंतु त्यांच्या जीवनात डोकावून बघितल्यास असं दिसून येते कि पाचही स्तरांवर अंधारच अंधार आहे. कर्जबाजारी, आजारी, कौटुंबिक कलह इत्यादी गोष्टींनी ग्रासलेले टीजीएफ चे हे साधक असं दांभिक जीवन जगताना दिसून येतात. खोटं बोलणे, चुगल्या करणे, समोरच्याला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करणे हि त्यांची नैतिकता आहे ! 

अश्या एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या अध्यात्मिक तर सोडाच पण माणुसकीला धरून सुद्धा नाहीत. मी माझ्या पुढील लेखामध्ये अजून विस्ताराने लिहणार आहेच. 

अश्या दांभिक गुरु आणि अश्या संस्थांपासून दूर राहा,  ह्यांचे गुलाम बनू नका. 

Comments